रायलिंग पठार :पुण्याजवळचा सह्याद्रीतील एक कॅम्पिंग पर्याय (Railing Plateau: A camping in Sahyadri near Pune)

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेले रायलिंग पठार, (याचं नाव बहुधा रायगड आणि लिंगाणा यांच्यावरून पडलं असावं ) सह्याद्रीचे विहंगावलोकन करण्यासाठी अप्रतिम जागा आहे. हे रा.तो.रा.त. (राजगड – तोरणा – रायगड – तळकोकण) मार्गावरचं एक महत्त्वाचं ठिकाण. रायलिंग पठार पुण्यापासून अंदाजे ७० किमीच्या अंतरावर मोहरी गावाजवळ असून, लिंगाणा किल्ल्याच्या अगदी जवळ आहे. येथून दिसणारा सूर्यास्त खूपच सुंदर आहे. रायगडाआड जाणारं सूर्यबिंब, अंगाला झोंबणारा भराट वारा हे अनुभवायचं असेल तर येथे यायलाच हवं. 

खूप दिवसांपासून मनाच्या घोळात घोळत असलेला घोळ एकदाचा संपला व रायलिंग पठारावर जायचा बेत ठरला. संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचे संक्रमण होत होतं आणि आमचं सह्याद्रीकडे.

2024 ची संक्रांत रायलिंग पठारावर करायची असं नक्की करून आम्ही निघालो. सोबत मी, अमोल, गजू, शुभम, ऋषी व भैय्या असे सहा जण तीन मोटरसायकलवर पुण्याहून निघालो. जायचा रस्ता मुद्दाम ऑफ बीट असा काढला कारण खूप दिवसांपासून कादवे घाट पाहायचा होता खडकवासला पानशेत करत करत आम्ही वेल्ह्याचा मार्ग धरला.

कादवे घाटा ची खडी चढण चढून व वेडी वाकडी वळणे पार करत आम्ही निघालो.

पानशेत धरणाचे बॅकवॉटर पहात पहात आम्ही मार्गक्रमण करत होतो. कादवे घाटातून हे दृश्य खूप मनोहारी दिसते. कादवेखिंडीत आल्यावर समोर दर्शन झाले ते राजगड व तोरण्याचे. या खिंडीतून ही दुर्गरत्ने कुण्या स्थितप्रज्ञ योग्यासारखी दिसत होती. कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यात हे दुर्ग अजूनच दुर्गम दिसतात. वेल्ह्यात कचोरी, चहा, वडापाव प्रभृतींची उराउरी भेट घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आता या भागात रस्ते झाल्याने प्रवास सुखकर झाला आहे तरीसुद्धा तोरण्याला वळसा घालत एका बाजूला तोरणा किल्ला व दुसऱ्या बाजूला कानंदीच खोरं व कानंदीवर असलेलं गुंजवणी धरण हे विलोभनीय दृश्य वळणावळणावर दिसत होतं.

नुकताच भारतात बायकोट मालदीव चा ट्रेंड चालू झाला होता तेव्हा हे कानंदीचा दृश्य हे मालदीवपेक्षा कमी नाही हे जाणवलं. 

तोरण्याची झुंजार माची, बुधलामाची मान वर करून बघावी लागत होती. भट्टी गावापासून रस्ता पुढे आणखीनच बिकट व चढणीचा होत जातो. 

पासलेगाव सोडलं की समोर डोंगरमाथ्यावर काळेश्वरीचं ठाणं आहे. तेथून एक रस्ता माढे घाटाकडे तर दुसरा मोहरी सिंगापूर कडे जातो आता आम्ही आमचा मोर्चा सिंगापूरकडे वळवला. सूर्यनारायण पश्चिम क्षितिजावर ढळत होते व सूर्यास्ताची चाहूल लागत होती. पुढे कुसारपेठ पर्यंत रस्त्याने साथ दिली व तिथून पुढे दगड धोंड्यांची वाट;त्यातून बंद पडत असलेल्या गाड्या चालू करत कसरतीचा प्रवास चालू झाला.एव्हाना अंधारायला लागलं होतं. समोरच्या डोंगराला वळसा घालताच दर्शन झालं ते लिंगाणा व श्रीमान रायगडाचं.  एक स्वराज्याचं कारागृह तर दुसरं राजगृह.  सूर्यबिंब केव्हाच बुडालं होतं, परंतु सांज अशी काही खुलली होती की जणू लांब क्षितिजावर कुठे प्रचंड मोठी आग लागावी आणि त्याचं आभामंडळ तयार व्हावं असं दृश्य समोर होतं. हे निसर्गाच साजरं रूप डोळ्याचं पारणं फेडत होतं, परंतु अजून मोहरी गाव दूर असल्याने आम्ही प्रवासाला सुरुवात केली. थोड्याच वेळात सिंगापूर व मोहरी गावच्या दुभाजकाजवळ आम्ही थांबलो. मोहरी गावाच्या रस्त्याचं काम चालू असल्याने वाहने इथेच उभी करावी लागली. आता काळाकुट्ट अंधार झाला होता हळूहळू सर्व सामान व टेन्ट घेऊन आम्ही मोरी गावात पोचलो. आता पाण्याचा शोध घेणे गरजेचे होते. विचारणा केली असता ‘वाईचं हितचं हाय की’ अशी माहिती मिळाली.त्याचं घरातून पोहरा घेऊन मी अन् ऋषिकेश पाण्याच्या मोहिमेवर निघालो. प्रचंड निसरडी वाट उतरून एका दरीच्या तोंडाजवळ गावाची विहीर होती. त्या विहिरीचे पाणी पोहऱ्याने भरून वीस लिटरचा जार डोक्यावर घेऊन तो चढ चढताना खूपच दमछाक झाली. पुन्हा मोहरी गावात पोहोचलो. अजून रायलिंग पठार बरेच दूर होते. वेळ न दवडता टॉर्च चा उजेड आणि सर्वच वजनदार सामान घेऊन आम्ही निघालो मध्येच घनदाट झाडी तर कधी उजाड रान ओलांडत आम्ही रायलिंग पठारावर पोहोचलो. मोहरी ते रायलिंग हा अंधार ट्रेक केल्याने बऱ्याचदा घसरूनही पडलो.  पठारावर पोचताच समोर अंधारात लिंगाणा काळ्याकुट्ट अस्वला सारखा दिसत होता. खाली खोल दऱ्यांमध्ये मिणमिणत्या लाईटांवरून रायगड राहाळातली पानेगाव, दापोली, छत्री निजामपूर ही गावे ओळखू येत होती.

लागलीच टेन्ट लावून, सरपण आणले आणि दोन जणांनी पातेल्याचं बूड घेऊन (पातेलं उसन आणल्याने ते काळं होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार होती.) तीन दगडांची चूल मांडली. पटपट भाजीपाल्याची कापाकापी करून खमंग फोडणी देत बासमती शिजला व खूप चालून चांगलीच भूक लागल्याने सर्वांनी खिचडीवर ताव मारला काहीजण लागलीच पेंगुळले, तर मी शुभम व अमोल निरभ्र आकाशातील अनंत चांदण्या पाहात त्या मोबाईल मध्ये कैद करण्याचा प्रयत्न करत होतो.

म्हणतात ना ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ तसे नाईट फोटोग्राफीचे दृश्य मोबाईल मध्ये कैद होत होते.

हे सर्व सोपस्कार गप्पा मारत मारत पार पाडले व त्या अथांग आभाळाखाली सह्याद्रीचा भराट वारा अंगावर घेत थोरल्या धन्याच्या समाधीकडे बघत मन शिवकाळात पोचले. महाराजांच्या समाधी जवळचा लाईट दुरून लुकलुकत होता. एवढ्या निबीड अरण्यात, डोंगरदऱ्यांतून त्या काळी मावळे कसा प्रवास करत असतील ही कल्पना अंगावर काटा उभा करून गेली. टेंट मध्ये येऊन मी आणि शुभम खूप वेळ गप्पा मारत मारत झोपी गेलो.

सूर्योदयापूर्वी उठल्याने पहाट कशी फुटते याचा एक अंदाज आला हळूहळू तोरण्यावरून सूर्यबिंब डोकावू लागलं आणि संपूर्ण आसमंत त्या कोवळ्या सूर्यप्रकाशात न्हावून निघाला. आता दऱ्याखोऱ्या प्रकाशमान झाल्या होत्या. तेव्हा शाळेत शिकलेली एक कविता ओठावर आली “फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश” त्या स्वच्छ सूर्यप्रकाशात रायगडाचं राजबिंड रूप पाहून आपसूक हात जोडल्या गेले. जगदीश्वराचं राऊळ, नगारखाना, राजसदर, शिवसमाधी दृश्यमान होत होती.

लांबवर दिसणारा कोकणदिवा, मागे तोरणा,  राजगड तर समोर कोकणात उतरणाऱ्या वेगवेगळ्या नाळा त्यात आग्याची नाळ, फणशीची नाळ, फडताळनाळ पाहत होतो.

एव्हाना भूक लागली होती. लगेच पोह्याचा बेत झाला. रात्रीची खिचडी आणि गरमागरम पोहे व चहा घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.

कसे जाल? : 

पुण्यावरून वेल्हे गाठावे. वेल्हे – भट्टी – पासले करत डोंगरमाथ्यावर आलं की उजवीकडे कुसारपेठ – सिंगापूर  या रस्त्याने 

मोहरी गावात यावे. गावातून पाठरावर जाण्यास मळलेली पायवाट आहे. 

राहण्याची सोय: 

सोबत टेन्ट घेऊन जाऊ शकतो

पाणी व जेवण:

पाणी मोहरी गावातून विहिरीवरून घेऊन जावे. जेवणाची सोय स्वतः करावी.

Leave a Comment